





श्रीयोगीन्द्र मठाचे कार्य : – नवधाभक्तीप्रमाणे यथाशास्त्र गणेशभक्ती करणे. तसेच गणेशाची कृपा मिळवण्याची इच्छा असणाऱ्या भक्तांकडून चतुर्थी व्रतपूर्वक गणेशभक्ती योगीन्द्रसांप्रदायानुसार निग्रहपूर्वक करवून घेणे. गणेश उपासने संबंधी योग्य मार्गदर्शन करून साधने, गाणेशग्रंथ, पुराणांतर्गत स्तोत्र इ. उपलब्ध करून देणे.
श्रीमोरेश्वर क्षेत्री येणाऱ्या गणेशभक्तांचे प्रथम कर्तव्य :- प्रथमतः या गाणेश गुरुपीठाचे दर्शन घेऊन गणेश तीर्थस्नान व योगीन्द्रमठानुज्ञेने नित्ययात्राविधिपूर्वक मोरेश्वराची सेवा साधणे . श्रीनग्नभैरवराजप्रभूचे तसेच योगीन्द्र समाधीचे दर्शन घेऊन मठानुशासनाप्रमाणे उपासना साधणे.
श्री योगीन्द्रमठाची पूर्व परंपरा :- या गुरुपीठाला आद्य कृतयुगापासूनची परंपरा आहे. कलीयुगातील या पीठाचे आद्य आचार्य – श्रीमद गिरिजासुत योगीन्द्र महाराज यांनी आद्य शंकराचार्याच्या उपदेशाप्रमाणे या योगीन्द्रमठाची स्थापना केली.
श्रीमद गणेश योगीन्द्राचार्य महाराज : – हे स्वतः प्रत्यक्ष मोरयाचे व मुदगलांचे पूर्णावतार होते. २२८ वर्ष इतके दीर्घ आयुष्य त्यांना लाभले होते. त्यांनी संपूर्ण गणेश मार्गाचा प्रसार केला. पाखंडी लोकांचे पूर्ण खंडन करून सर्वत्र दिग्विजय केला. कोट्यावधी सांप्रदायी त्यांनी निर्माण केले. मोरेश्वर क्षेत्राचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की, प्रत्यक्ष त्यांची सेवा करता यावी, यासाठी स्वतः विष्णू, शिव, सूर्य, ब्रह्मदेव व गुणेश या पाच देवांनी मानव देह धारण करून त्यांचे शिष्यत्त्व पत्करले. मोरेश्वर क्षेत्रात राहून त्यांनी अखंड मोरयाची सेवा केली.
यांचा अवतार काळ – श्रावण शु. ५ शके १४९९ (इ. स. १५७७)
समाधी काळ – माघ वद्य १० शके १७२७ (इ. स. १८०५)
श्रीमद गणेशयोगीन्द्र महाराजांच्या नंतर सुमारे पन्नास पाऊणशे वर्ष हा काळ लुप्त होता. त्यानंतर श्रीमद अंकुशधारी महाराज यांनी योगीन्द्रांच्या आज्ञेने या गुरुपीठाचा पुनरुद्धार केला. गणेश भक्तांच्या कल्याणासाठी निरनिराळी स्तोत्र इत्यादी रचून गाणेश ग्रंथ अनुष्ठान पूर्वक मिळवून देऊन भक्तांना मार्ग मिळवून दिला. मोरयाला प्रसन्न करून घेऊन आयुष्यभर मठात राहून तप केले व साधकाने कसे राहावे, याचा आदर्श भाविकांसमोर ठेवला.
यांचा अवतार काळ – मार्गशीर्ष शु. ६ शके १८०१ (इ. स. १८७९)
समाधी काळ – माघ शु. १५ शके १८४१ (इ. स. १९१९)
या नंतर अंकुशधारी महाराजांचे शिष्य श्री गाणेशवरिष्ठगाणपत श्रीमद हेरंबराज महाराज यांनी या योगीन्द्रमठाचे कार्य चालविले. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच आपल्या घराचा त्याग करून अखंड गुरुसेवेला वाहून घेतले. आदर्श गुरुसेवा कशी असावी याचा आदर्श साधकांसामोर ठेवला. कठोर तपश्चर्येने गणेशाला प्रसन्न करून घेऊन मठात राहून अंकुश मासिक पन्नास वर्षे चालविले व गणेशभक्तीचा प्रसार केला.
यांचा अवतार काळ – श्रावण शु. ७ शके १८१४ (इ. स. १८९२)
समाधी काळ – पौष शु. १ शके १८९६ (इ. स. १९७४)
श्रीयोगीन्द्र मठातील व्रतांमधील अत्यंत महत्वाचे उत्सव
श्रीमयुरेशजन्म – भाद्रपद शु. १ ते ४
श्रीयोगीन्द्र पुण्यतिथी उत्सव – माघ शु. १५ ते माघ वद्य १०
श्री.गा. बालविनायक महाराज लालसरे
मोरगांव, (जि. पुणे)
श्री योगीन्द्रमठाद्वारे प्रकाशित गाणेश वाङ्मय
- श्री गाणेश भजन
- गाणपत आरती संग्रह
- भूस्वानंद क्षेत्र वर्णन
- श्रीगणेश गीता
- गणेश कवच
- श्रीगणेश हृदय
- गणेश पुजाविधी
- श्रीवक्रतुंड स्तोत्र
- श्रीयोगीन्द्र विजय
- श्रीगणेश स्तोत्र संग्रह
- श्री स्वानंदेश स्तोत्र
- श्रीकरुणाष्टक रत्नमाला
- चतुर्थी माहात्म्य प्रशस्ती
- श्री गणेश सहस्त्रनाम
- गणेश स्तवराज
- गणेश कीलक
- एकवीस गणेश क्षेत्र महिमा
- नित्यपाठ
- रोगशमनाष्ट्क स्तोत्र
- श्रीगणेशगीता रहस्य
- श्रीयोगेश्वरी
- श्रीगणेश गुह्य स्तोत्र
- श्री हेरंबराज महाराज चरित्र
- श्रीब्रह्मणस्पति सूक्त
- श्री गणेश अथर्वशीर्ष
- द्वारयात्रा महत्व व विधान
- श्री गणेश उपासनेचा पहिला धडा
- श्रीमुद्गल पुराण (पाकृत ओवीबद्ध)
- श्रीगणेशपुराण (पाकृत ओवीबद्ध)
- श्री गणेश विजय
- सर्वपूज्य पंचेशवरद भगवान श्रीगणेश (मराठी)
- श्रीगणेश योगीन्द्र चरित्र (मराठी)
- श्री योगीन्द्र गुह्य स्तोत्र
- श्रीगणेशपुराण (संपूर्ण मराठी अर्थासह, तृतीय आवृत्ती)
- श्री गणेश योगीन्द्र चरित्र (हिंदी)
- श्रीगणेशपुराण – (हिंदी अनुवाद काही काळात प्रकाशित होणार आहे)
- चतुर्थी माहात्म्य प्रशस्ती द्वारयात्रा – महिमा समेत (हिंदी)
- पंचेशवरद सर्वपूजनीय भगवान श्रीगणेश (हिंदी)
- श्री गणेश उपासना का प्रथम पाठ(हिंदी)
- श्रीगाणेश भूपाळीसमूह व इतर
श्री गाणेश स्तोत्र
श्री योगीन्द्रमठाद्वारे प्रकाशित चरित्र आणि पुस्तके
अधिक मास : १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२० ( ढौंढमास अथवा अधिक मास माहात्म्य )

चैत्र ते फाल्गुन या बारा ही मासां मध्ये अनेक वेळा तिथींचा क्षय-वृद्धि होत असते व त्यामुळेच प्रत्येक तीन वर्षानी मराठी तेरावा मास येत असतो. त्यालाच ‘अधिक’ अथवा ‘ढौंढ’ मास म्हणतात.
या सर्वच मासांनी क्रमाने देवादिकांची तपश्चर्या करुन विशेष वरदान प्राप्त करुन घेतले आहे व अंती सर्वांनीच श्री गणेशाराधन करुन भगवान गणराज प्रभुं कडून विशेष आराधनपुर्वक वरदान प्राप्त करुन घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक सांप्रदायातच अधिक मासाचे फल हे ‘अधिक’ असते.
वैष्णव सांप्रदायात याला ‘पुरुषोत्तम मास’ तर श्री गाणेश सांप्रदायात ‘ढौंढ मास’ अथवा ‘मल मास’ असे म्हणतात.
अधिक महिन्यात केलेल्या उपासनेचे फळ; हे इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासनेच्या फळापेक्षा असंख्य पट अधिक असते. प्रत्येक शुभाशुभ कर्माला हा नियम आहे. साधकांसाठी हा मोठा पर्वकाळ अथवा उपासनेची मोठी संधीच असते.
यास्तव प्रत्येक गणेश भक्त साधकानी अधिक महिन्यात आपल्या उपलब्ध वेळेनुसार शक्य होईल तेवढी उपासना वाढवुन सोबत दिलेल्या मंत्राचा नित्य किमान १०८ जप व स्तोत्र नित्य किमान एक वेळा अथवा शक्यता व वेळेनुसार ७, ११, २१, ३३ अथवा होईल तेवढे पठण करुन श्री गणेश कृपेचा लाभ घ्यावा.
सविस्तर माहिती श्री योगीन्द्र मठ स्थानी उपलब्ध होऊ शकेल.
(आधार — श्री मुद़्गल पुराण )
जप : ‘ नमो ढुंढिराजाय सर्वेश्वराय’
स्तोत्र :
|| श्रीमद् ढुण्ढिराज करुणाष्टक ||
( शार्दूल विक्रीडित )
स्वानन्देश्वर ढुंढिराज सदया श्री सिद्धिबुद्धिप्रिया | भक्ताभिष्टकरा सुराऽसुर नरां संसेव्य तूं सिद्धया || जीवांही जगदीश्वरांहि तुजला ढुंडुनिया सेविले | येई धांवुनि ढुंढिराज झणीं तू मी त्रस्त मायामलें || १ ||
मिथ्या देहममत्व मुख्य मल हा मूला अहंता तिथे | नाना मोहद वासना विषयिणी चित्ती सदा राहते || नाहि आवर घेत लेशभरि ती पाडी भवीं या बले | येई धांवुनी ० || २ ||
संसारी विरती विवेक जरि दे ख्याती जनी आवडे | दंभी चित्त मलीन होइ विषयेच्छा त्या विरागी दडे || नाही निर्मल भक्ति होत, तुजसी सर्वात्मया ते कळे | येई धांवुनी ० || ३ ||
नाना साधनि कर्मभक्त सुपथी राहे अहंतामल | मिथ्या भान विलंब विघ्नमयता, नाही गती निर्मल || वेदी ढुंढित तूंचि एक ठरला ब्रम्हेश दैवे कळे | येई धांवुनी || ४ ||
काया वाङमन संगती विषय हे वेगे मला बाधिती | प्रारब्धार्जित कर्मबीज धरुनी आत्मार्थ ते साधिती || देई भक्ति सुनिर्मला अविरता ते व्यर्थ जीच्यामुळे | येई धांवुनी || ५ ||
सांगाती गणराज भक्त मज दे, स्त्री पुत्र – मित्रादिक | तेणे होई विहार भक्तिमय की सर्वस्व तत्साधक || हे बुद्धीश्वर सिद्धिनाथ गणपा तु साधिशी ही फळे || येई धांवुनी ० || ६ ||
आता लावि न वेळ पाहि नचि की हा भक्त आहे – नव्हे | तू स्वाधिन, तुला न कोणी पुसता, येई कृपा वैभवे || मी हा स्वीकृतसाच होई न पहा संत्यक्त मायामले | येई धांवुनी || ७ ||
श्रीमद् विघ्नहरा प्रभा प्रियकरा मायूर नाथा परा | स्वेच्छाधीन बला, तुझीच कमला दारा प्रिया सुंदरा || भूस्वानन्द निवास कृत् निजजनोध्दारार्थ तूं हे कळे | येई धांवुनी || ८ ||
(अनुष्टुप ) श्री ढुण्ढिराज करुणाष्टक मायामला हरी | अर्पिले बालहेरम्बे ढौंढ मासीं गणेश्वरीं || ९ ||
|| जय जय गणराज समर्थ ||
|| श्री ढुण्ढिराजार्पण मस्तु ||
श्री. गा. बालविनायक स. लालसरे
श्री योगीन्द्र मठ, मोरगांव
संपर्क : ९८५०९३१४७९, ८६३७७१२८३३